छत्री ची आत्मकथा मराठी निबंध - Chatri Chi Atmakatha in Marathi
मी एक छत्री बोलत आहे. माझा उपयोग पावसाळ्याच्या दिवसात मोठ्या प्रमाणात केला जातो. पावसाळ्यात मी पडणाऱ्या पावसापासून तुमचे रक्षण करते. या शिवाय आजकाल उन्हाळ्यातही माझा उपयोग केला जातो. उन्हाळ्याच्या दिवसातील तीव्र उन्हापासून शरीराचे संरक्षण करण्यासाठी मला वापरले जाते.
पावसाळ्यात पडणारे पावसाचे पाणी अडवून मी बाजूला टाकते. या शिवाय उन्हाळ्यात सूर्याचे ऊन शरीरावर पडण्यापासूनही मी तुमचे रक्षण करते. परंतु जास्त करून माझा उपयोग पावसातच केला जातो. पावसाळ्याच्या दिवसात तुम्ही मला आजूबाजूला सहज पाहू शकतात. पावसाळ्याच्या या दिवसात मी खूप उपयोगाची वस्तू बनून जाते. या दिवसांमध्ये माझी खूप काळजी घेतली जाते. मला प्रेम आणि सन्मानाने ठेवले जाते.
मी रंगीबिरंगी आणि वेगवेगळ्या रंगांमध्ये येते. परंतु जास्तकरून लोक मला काळ्या रंगांमध्ये खरेदी करतात. रंग कोणताही असो आमचे कार्य सारखेच असते. पावसाळा सुरू होण्याच्या अगोदरच माझी वेगवेगळी रूपे बाजारात उपलब्ध असतात. लांब दांड्यावली आणि घडी घालता येणारी छत्री मोठ्या प्रमाणात विकल्या जातात. परंतु लोकांना घडी घालता येणारी छत्री जास्त आवडते. कारण माझ्या या रूपाला फोल्ड करून बॅग व पिशवी मध्ये ठेवता येते.
पावसाळ्यात तर माझी मौज असते. परंतु दुसरीकडे पावसाळ्याचे चार महिने संपले की मी घराच्या कोपऱ्यात पडून राहते. वाट पाहत राहते की केव्हा पाऊस येईल व केव्हा कोणीतरी मला उघडून थंड पावसाचा स्पर्श करविल. मला लोकांची मदत करायला आवडते. स्त्री असो वा पुरुष मी प्रत्येकाला पावसात भिजण्यापासून वाचवते.
पावसाळ्यातील वादळा मुळे बऱ्याचदा मला कठीण संकटाला सामोरे जावे लागते. पाऊस व वादळी वारे मला उडवून नेण्याचा प्रयत्न करतात. मोठ्या प्रमाणात आलेल्या हवेमुळे बऱ्याचदा माझ्यातील तार तुटतात. अश्या तुटलेल्या परिस्थितीत मी माझ्या मालकाचे योग्य पद्धतीने रक्षण करण्यास असमर्थ होते. परंतु तरही मी थोडे फार का होईना भिजण्यापसून वाचवतेच.
मला आशा आहे की आज माझे जसे अस्तित्व आहे, भविष्यातही तसेच राहील. माझा जन्म मानव जातीच्या सेवेसाठी झाला आहे. व माझे हे कर्तव्य करण्यात मला अत्यंत आनंद आहे.
***