ग्रंथ हेच गुरु मराठी निबंध | Granth hech guru nibandh Marathi
भारतीय संस्कृतीत गुरूचे स्थान पूजनीय आहे. कोणत्याही व्यक्तीला यशस्वी होण्यासाठी गुरुची आवश्यकता असते. आपल्या संस्कृतीत गुरुची महती 'गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरा' अश्या पद्धतीने गायली आहे. गुरु प्रमाणेच ग्रंथ हा एक असा खजिना आहे, ज्याचा जितका उपयोग आपण करू तितकेच समृद्ध होत जाऊ. ग्रंथ अज्ञानाचा अंधकार दूर करून प्रकाश निर्माण करतात. ग्रंथातून असीम ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सोपविले जाते. आज विज्ञानाने जी प्रगती केली आहे तिचे रहस्य याच ग्रंथामध्ये दडलेले आहे. ग्रंथ आपल्याला खूप काही शिकवतात. ग्रंथांच्या मदतीने आपल्याला आपली संस्कृती व धर्मा बद्दलची माहिती मिळते. ग्रंथात लिहिलेल्या गोष्टी आपल्याला योग्य मार्गावर चालण्याची शिक्षा देतात.
बालवयात सांगितल्या गेलेल्या गोष्टी मुलांच्या बालमनावर खूप परिणाम करतात. आजी आजोबा कडून ऐकण्यात आलेल्या गोष्टी मुलांना खूप प्रभावित करतात. या सर्व गोष्टी ग्रंथामध्ये लिहिलेल्या असतात. ग्रंथ एकाकीपणात आपल्याला धीर देतात. म्हणून अनेक महान लोकांनी ग्रंथाचे महत्व सांगितले आहे. लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात आपला प्रसिद्ध ग्रंथ गीतारहस्य लिहिला. महात्मा गांधींनी माझे सत्याचे प्रयोग हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिलेला आहे. महान लोकांद्वारे लिहिलेले हे सर्व ग्रंथ अथांग ज्ञानाचा सागर आहेत.
ग्रंथ आपल्याला अनेक गोष्टी शिकवतात. प्राचीन भारतीय ग्रंथ जसे वेद, गीता, रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी, दासबोध इत्यादी अनेक ग्रंथ जीवन जगण्याची पद्धत शिकवतात. भारतीय वेद हे जगातील प्रथम धर्मग्रंथ आहेत. याच वेदांपासून इतर धर्मांची उत्पत्ती झाली आहे. वेद परमेश्वराद्वारे ऋषी मुनींना सांगण्यात आले होते. वेद प्राचीन ज्ञानाचा अथांग सागर आहेत. प्राचीन ग्रंथापैकी एक श्रीमद् भगवद्गीता भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला महाभारत युद्धाच्या वेळी सांगितली होती. गीते मध्ये 18 अध्याय आहेत. गीते मध्ये एकेश्वरवाद, कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तीयोग इत्यादींची सुंदर पद्धतीने चर्चा केली आहे.
मी अनेक ग्रंथ वाचले आहेत व अजुनही वाचत आहे. मला वाचायला खूप आवडते वाचन हा माझा छंदच आहे. संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेला ग्रंथ ज्ञानेश्वरी अनेक भाषांमध्ये प्रकाशित आहे. या ग्रंथाला त्यांनी 1290 साली लिहिले होते. हा ग्रंथ भगवत गीतेचा मराठी अनुवाद होता. या ग्रंथाद्वारे ज्ञानेश्वरांनी संस्कृत भाषेतील ज्ञान सर्वांना समजेल अशा पद्धतीने प्राकृत भाषेत समजावून दिले.
आज प्रत्येकाने ग्रथ वाचनाची सवय लावून घ्यायला हवी. प्रत्येक गावात एक तरी ग्रंथालय बनवायला हवे. जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना पुस्तके वाचायला मिळतील कारण ग्रंथ हे केवळ गुरु नसून आपले चांगले मित्र देखील असतात.
--समाप्त--