माझे आवडते लेखक मराठी निबंध sane guruji essay in marathi
मराठी भाषेतील महान साहित्यिक, शिक्षक आणि समाजसेवी पांडुरंग सदाशिव साने अर्थात साने गुरुजी माझे आवडते लेखक आहेत. साने गुरुजींनी लेखना सोबतच देशसेवेचे कार्य ही केले. भारतीय स्वातंत्र्ययुद्धात त्यांनी स्वातंत्र्यसेनानी म्हणून महत्त्वाची कामगिरी केली. व स्वदेशी आंदोलनादरम्यान त्यांना तुरुंगवास सुद्धा भोगावा लागला. साने गुरुजींनी आपल्या जीवन काळात जवळपास 73 पुस्तके लिहिली. त्यांना निसर्गाबद्दल प्रेम होते ते निसर्गाची पूजा करीत असत.
साने गुरुजींचा जन्म 24 डिसेंबर 1899 ला महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यामधील पालगड या गावी झाला. साने गुरुजींच्या वडिलांचे नाव सदाशिवराव साने तर आईचे नाव यशोदा बाई असे होते. साने गुरुजी हे त्यांच्या आई-वडिलांचे तिसरे अपत्य होते. गुरुजींचे वडील खोताचे काम करीत असत. तर त्यांची आई अतिशय दयाळू व सदाचारी स्त्री होती. त्यांनी साने गुरुजींना जीवनातील वास्तविक मूल्य शिकवण्यावर भर दिला. जीवनाच्या सर्व अवस्था आणि कक्षा व्यापणारी त्यांची आई हीच त्यांची देवता होती. “आई माझा गुरु आणि आई माझी कल्पतरू” असे आपल्या आईचे वर्णन त्यांनी आपल्या प्रसिद्ध कादंबरी श्यामची आई मध्ये केले आहे.
सानेगुरुजी अतिशय संवेदनशील होते व शेवटपर्यंत असेच राहिले. देशातील राजकीय उलथापालथी मुळे त्यांच्यात देशभक्तीची भावना जागृत झाली. त्यांनी नियतकालिकातून राष्ट्रवादी लेख लिहिण्यास सुरुवात केली. लोकमान्य टिळक व महात्मा गांधी हे त्यांचे आदर्श होते. नंतरच्या काळात त्यांनी आपली शिक्षकाची नोकरी सोडून खेडा गावांमध्ये जाऊन सभा आयोजित करणे सुरु केले. आपल्या सभांच्या माध्यमातून ते लोकांना देशाविषयी जागृत करीत असत. गुरुजींच्या राजनेतिक कार्यामुळे त्यांना पंधरा महिने नाशिकच्या जेलमध्ये काढावे लागले. नाशिकच्या कारागृहात त्यांनी आपली प्रसिद्ध कादंबरी 'श्यामची आई' चे लेखन केले. श्यामची आई हे मी आजवर वाचलेल्या पुस्तकांमध्ये 'माझे आवडते पुस्तक' आहे. साने गुरुजींनी श्यामची आई या पुस्तकाचे लेखन अवघ्या चार दिवसात संपवले. धुळ्याच्या कारागृहात असताना गुरुजींनी, विनोबा भावे यांनी सांगितलेला 'गीताई' ग्रंथ लिहिला.
याशिवाय साने गुरुजींनी विपुल मराठी लेखन केले. अमोल गोष्टी, आपण सारे भाऊ, आस्तिक, इस्लामी संस्कृती, कर्तव्याची हाक, कला आणि इतर निबंध, कला म्हणजे काय?, कल्की अर्थात संस्कृतीचे भविष्य, गुरुजींच्या गोष्टी, गोड गोष्टी (भाग 1 ते 10) इत्यादी प्रसिद्ध आणि विशेषतः लहान मुलांसाठी उपयुक्त पुस्तके त्यांनी लिहिली. वयाच्या अवघ्या 50 व्या वर्षी गांधीजींच्या हत्येने अस्वस्थ आणि निराश साने गुरुजी या महान आत्म्याने अतिप्रमाणात झोपेच्या गोळ्या खाऊन आपले जीवन संपवले. परंतु मृत्यूच्या 70 वर्षांनंतरही ते आपल्या अजरामर लेखनाने लोकांमध्ये जिवंत आहेत.
--समाप्त--