माझे बालपण - Maze balpan marathi nibandh
लहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ।।
ऐरावत रत्न थोर । त्यासी अंकुशाचा मार ।।
ज्याचे अंगी मोठेपणा । तया यातना कठीण ।।
तुका म्हणे जाण । व्हावे लहानाहूनि लहान ।।
संत तुकाराम महाराज आपल्या या प्रसिद्ध अभंगात देवाला विनंती करीत आहेत, "हे पांडुरंगा, मला ह्या संसारातील जो व्यक्ती सर्वात लहान आहे त्याहून लहान बनव, तू मला लहानपण दे. बालपण आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर काळ असतो. या कालावधीत घडलेल्या गोष्टी आयुष्यभर स्मरण राहतात. लहानपणी व्यक्तीला काहीही चिंता राहत नाही. खेळकुद आणि शाळेच्या मस्तीत संपूर्ण वेळ जातो.
माझे बालपण देखील अनेक आनंदी क्षणांनी भरलेले होते. बालपणातील सर्व गोष्टी मला आजही जश्याच्या जश्या आठवतात. माझा जन्म महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातल्या लहानशा खेड्या गावात झाला. माझ्या गावाची लोकसंख्या जवळपास 5000 लोकांची होती. गावाजवळून एक नदी वाहायची. लहान असताना माझे गावात अनेक मित्र होते व मी तासन्तास माझ्या मित्रांसोबत खेळ खेळत असायचो. लहानपणीच मी सायकल चालवणे आणि पोहणे शिकलो. मी आणि माझे मित्र दररोज नदीच्या पाण्यात पोहायला जायचो.
लहान असताना माझ्याकडे भरपूर वेळ होता. मी गावाच्या प्राथमिक शाळेत शिकत होतो. शाळा सकाळून असल्याने मी दररोज सकाळी लवकर उठून जायचो. माझी आई माझी तयारी करून द्यायची. आमच्या शाळेत खूप चांगले शिक्षक आणि शिक्षिका होत्या. यातील काही शिक्षक तर आमच्याच गावातील होते. दररोज आम्हाला छानपैकी नवनवीन गोष्टी शिकवल्या जायच्या. शाळेतून घरी आल्यावर मी मित्रांसोबत खेळायला जायचो. आम्ही गावाच्या अथवा शाळेच्या मोकळ्या पटांगणात वेगवेगळे खेळ खेळायचो. त्या वेळी शाळेचा फार जास्त अभ्यास नसल्याने खेळून आल्यावर अर्धा ते एक तास मस्तपैकी होमवर्क पूर्ण करायचो.
तेवढ्यात भयानक भूक लागलेली असायची. खेड्या गावांमध्ये संध्याकाळी जास्तकरून खिचडी बनवली जाते. मग 8 वाजेच्या सुमारास आम्ही कुटुंबातील सर्वजण जेवत असू. जेवण झाल्यावर तर केव्हा झोपावे आणि केव्हा नाही असे होऊन जाई.
माझ्या बालपणी आईवडिलांनी माझे खूप चांगले संगोपन केले. माझ्या सर्व योग्य आवश्यकता ते पूर्ण करीत असत. लहानपणीच आम्हाला कुटुंबाचे महत्व लक्षात आले आणि एकमेकांची मदत कश्या पद्धतीने करावी याबद्दल शिकवण मिळाली. लहानपणी आजी बाबांनी मला अनेक गोष्टी शिकवल्या. पुस्तकी ज्ञाना ऐवजी सर्वात उपयुक्त म्हणजे व्यवहारी ज्ञान मला शिकवले.
बालपणी जेव्हा शाळेला उन्हाळी सुट्ट्या लागत असत. तेव्हा एक-दोन महिन्यांसाठी मी माझ्या मामाच्या गावी जात असे. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मामांच्या गावी जायचे दरवर्षीचे ठरलेले असायचे. याच दरम्यान माझ्या मामांच्या गावात जत्रा लागत असे. मला माझी आजी किंवा मामा या जत्रेत नेत असत. जत्रेतील वेगवेगळे पदार्थांचा आम्ही आस्वाद घायचो.
माझ्या बालपणी कॉम्प्युटर अथवा मोबाईल येवढे प्रगत नव्हते. आमच्या घरातही साधे बटण असलेले मोबाईल होते. तेव्हा आम्ही फक्त टीव्ही ला मनोरंजनाचे साधन वापरायचो, या शिवाय कधी कधी सिनेमा हॉल मध्ये जाऊनही चित्रपट पहायचो.
बालपण खरोखर खूप सुंदर होते. आज जेव्हाही मला लहानपणाची आठवण येते तेव्हा वाटते की काश.. माझे बालपण मला परत मिळायला हवे. तीच मस्ती तोच आनंद मला पुन्हा अनुभव करण्याची तीव्र इच्छा आहे. आज चे आयुष्य खूप पळापळीचे झाले आहे. ज्यामध्ये आयुष्याचा खरा आनंद अनुभवणे कठीण आहे. ही गोष्ट खरी आहे की जेव्हा आपण लहान असतो तेव्हा लवकर मोठे होण्याची स्वप्न पाहतो, परंतु मोठे झाल्यावर लक्षात येते की या समझदारी च्या जगापेक्षा तर लहानपण कितीतरी पटीने चांगले होते.