माझे आवडते पुस्तक श्यामची आई | Maze avadte pustak shyamchi aai
मला पुस्तके वाचायला खूप आवडते, पुस्तक वाचन हा माझा छंद आहे. तसे पाहता आज पर्यंत मी अनेक पुस्तके वाचली आहेत. त्यातील काही पुस्तके मला खूपच आवडली आहेत. मला आवडणाऱ्या अश्याच पुस्तकांपैकी एक पुस्तक आहे 'श्यामची आई'. या पुस्तकाला पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच आपल्या साने गुरुजींनी लिहिले आहे. श्यामची आई ही सानेगुरुजींचे आत्मकथा आहे. या पुस्तकात साने गुरुजींनी आपल्या आईबद्दल प्रेम, भक्ती आणि कृतज्ञता मांडली आहे. या पुस्तकाच्या आजपर्यंत तीन लाखापेक्षा जास्त प्रती विकल्या गेल्या आहेत.
स्वातंत्र्य युद्धातील साने गुरुजींच्या सहभागामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. 9 फेब्रुवारी 1933 रोजी नाशिकच्या तुरुंगात असताना त्यांनी श्यामची आई हे पुस्तक लिहिण्यास सुरुवात केली. साने गुरुजी यांनी आपले बरेच लेखन तुरुंगात असताना केले. श्यामची आई हा कथासंग्रह त्यांनी अवघ्या पाच दिवसात लिहून संपवला. श्यामची आई या पुस्तकात साने गुरुजींनी 'ममतेचा महिमा' गायला आहे. त्याचबरोबर सुसंस्कृत व बालबोध घराण्यातील साध्या, सरळ व रम्य संस्कृतीचे चित्रणही यात केले. साने गुरुजी साठी त्यांची आई गुरु आणि कल्पतरू होती. "गाईगुरांवर, फुलपाखरांवर, झाडांमाडावर प्रेम करायला तिने त्यांना शिकवले.
आपल्या मुलांचे संगोपन कसे करावे ही कला गुरुजींच्या आईला चांगली माहीत होती. आपल्या आईसोबत घडलेल्या प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीचे वर्णन गुरुजींनी श्यामची आई पुस्तकात केले आहे. गुरुजींच्या आईने लहानपणापासून देशभक्ती आणि ईश्वर भक्तीची भावना त्यांच्यात व त्यांच्या भावंडात निर्माण केली. या संस्कारामुळे चंद्र सूर्यासारखी तेजस्वी फुले साने गुरुजीच्या रुपाने उमलली.
श्यामची आई पुस्तकातील एक एक शब्द स्फूर्तीमय आहे तो मनाला उभारी देऊन जातो. साने गुरुजींचा श्याम आणि त्यांची आई हे घराघरात आदर्श मानले गेले आहेत. आज जरी श्यामची आई मधील श्याम पडद्याआड गेला असेल तरी या पुस्तकाला वाचून नवीन श्याम तयार होत आहेत. म्हणूनच मी तुम्हा सर्वांना आपल्या आयुष्यात एकदा तरी श्यामची आई वाचण्याचा सल्ला देतों.
--समाप्त--