Advertisement

माझे आवडते पुस्तक अग्निपंख | my favourite book essay in Marathi

माझे आवडते पुस्तक अग्निपंख | my favourite book essay in Marathi

मी वाचलेल्या व मला सर्वाधिक प्रिय असणाऱ्या पुस्तकाचे नाव अग्निपंख आहे. हे पुस्तक भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी लिहिले आहे. अग्निपंख ही एपीजे अब्दुल कलाम यांची आत्मकथा आहे. या पुस्तकात अब्दुल कलाम यांच्या बालपणापासून तर राष्ट्रपति पदापर्यंतचा संपूर्ण प्रवास रचण्यात आला आहे. डॉक्टर अब्दुल कलाम भारताच्या यशस्वी शास्त्रज्ञापैकी एक आहेत. त्यांनी इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन मध्ये महत्त्वाचे योगदान दिले. भारताची सैन्य क्षमता वाढविण्यासाठी त्यांनी अनुचाचणी घेतली म्हणूनच त्यांना मिसाईल मेन म्हणूनही संबोधले जाते. 2002 सालापर्यंत ते अत्यंत लोकप्रिय झाले होते. म्हणूनच त्यांना भारताच्या राष्ट्रपतीपदासाठी निवडण्यात आले. 


अग्निपंख या पुस्तकात अब्दुल कलाम यांनी यांचे बालपणाचे जीवन ते राष्ट्रपती पदासाठी करण्यात आलेली निवड पर्यंतचा संपूर्ण जीवन परिचय रेखाटला आहे. या चारित्र्याची सुरुवात एका लहान मुलापासून होते जो नंतर इन्स्त्रो चा प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि भारताचे राष्ट्रपती बनतो. मला या पुस्तकातील सुरुवातीचे धडे जास्तीच आवडले कारण या धड्यांमध्ये भारताच्या 1930-1950 या कालखंडातील परिस्थितीचे चित्रण करण्यात आले आहे. अब्दुल कलाम यांचा जन्म धार्मिक नगरी रामेश्वरम मधील एका मुस्लिम कुटुंबात झाला. भारताच्या विभाजनापूर्वी असलेली देशातील धार्मिक एकता आणि एकत्मतेचे वर्णन अब्दुल कलाम यांनी पहिल्या दोन धड्यांमध्ये केले आहे. 


अब्दुल कलाम यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे की लहान असताना त्यांचे स्वप्न पायलट बनण्याचे होते. परंतु पायलट साठी असलेली इंटरव्यू परीक्षा ते अनुत्तीर्ण झाले. परंतु निराश न होता त्यांनी दुसऱ्या क्षेत्रात आपले करियर सुरू केले. पुस्तकात सांगितल्याप्रमाणे कलाम यांनी सुरवातीला विमान बनवण्याचे क्षेत्रात कार्य केले. नंतर ते भारतीय अंतरीक्ष संस्था इस्त्रो कडे वळले. अग्निपंख पुस्तकात अब्दुल कलाम यांनी  यशस्वीपणे पूर्ण केलेले सॅटॅलाइट आणि मिसाइल कार्यक्रमांची माहिती देण्यात आली आहे. अग्नी, आकाश, पृथ्वी, त्रिशूल, नाग या घरोघरी पोहोचलेल्या नावांच्या क्षेपणास्त्रांची जडणघडणही फार सुंदरपणे वाचकांना सांगितलेली आहे. हे पुस्तक केवळ डॉ. अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र नसून स्वतंत्र भारताच्या तंत्रज्ञानविषयक लढाईचे एक स्पंदन आहे. जागतिक शस्त्रस्पर्धेच्या राजकारणाची आणि विज्ञानाची ती कहाणी आहे; तसेच स्वयंपूर्ण होण्यासाठी आपल्या देशाने केलेल्या संघर्षाचे ते मनोहारी खंडकाव्यही आहे.


अग्निपंख पुस्तकात फक्त स्वतःचे चरित्र न मांडता, अब्दुल कलाम यांनी अनेक कवितांचा देखील समावेश केला आहे. हे पुस्तक तरुण तसेच प्रत्येक वयातील लोकांसाठी प्रेरणेचा अखंड स्त्रोत आहे. म्हणून प्रत्येकाने एकदा तरी अग्निपंख पुस्तक वाचायला हवे. या पुस्तकातील मला आवडलेल्या काही ओळी पुढील प्रमाणे आहेत. 

जिंकण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे जिंकण्याची गरज भासू न देणे. आपण जेव्हा संभ्रमरहित असतो, ताणरहित मनाने प्रश्नांना सामोरे जातो, तेव्हा आपल्यामधील सर्वोत्तम देऊ शकतो.

***